विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं काल अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या सहा दशकांच्या संगीत कारकिर्दीत झाकीर हुसैन यांना ५ ग्रॅमी पुरस्कार मिळाले. तसंच, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या देशातल्या नागरी सन्मानाचे ते मानकरी ठरले.
हुसैन यांच्या निधनामुळे संगीतविश्वाची मोठी हानी झाली आहे, त्यांना लाभलेली सर्जनशीलता आणि कल्पकता विलक्षण होती. ते भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताला जोडणारा पूल होते, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
हुसैन हे भारतीय शास्त्रीय संगीतविश्वात क्रांती घडवणारे खरे प्रतिभावंत म्हणून कायम स्मरणात राहतील, त्यांनी आपल्या प्रतिभेने लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं तसंच तबल्याला जागतिक स्तरावर प्रसिद्धीही मिळवून दिली, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात शोक व्यक्त केला आहे. तर प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, उत्तम वादनशैली आणि अंगभूत प्रतिभा यामुळे हुसैन यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आदरांजली वाहिली आहे.
तबल्याच्या नादमाधुर्याने संपूर्ण जगातल्या रसिकांना एका समेवर आणणारा सुपुत्र आपण गमावल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तर भारतीय अभिजात संगीताचा समृद्ध खजिना सातासमुद्रापार नेणारे प्रतिभावान कलाकार हुसैन यांचं जाणं संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारा असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
झाकीर हुसैन यांच्या निधनामुळे जागतिक आणि भारतीय संगीत क्षेत्रात भरून न येणारं नुकसान झालं आहे. आपण त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात सहभागी आहोत, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ सतारवादक रवी चारी यांनी देखील उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या.