देशात बेरोजगारीचा प्रश्न अद्यापही कायम असून सरकारला तो सोडवण्यात अपयश आल्याचं टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. संसदेच्या संयुक्त सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेत ते बोलत होते. सकल राष्ट्रीय उत्पादन १५ पूर्णांक ३ शतांश टक्क्यांवरून १२ पूर्णांक ६ शतांश टक्क्यांपर्यंत घसरलं असून हे गेल्या साठ वर्षांतलं सर्वात कमी उत्पादन आहे, असंही गांधी यावेळी म्हणाले. मेक इन इंडिया ही चांगली कल्पना असूनही तिची अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही गांधी यांनी यावेळी केली.
तत्पूर्वी, भाजपाचे रामवीर सिंह बिधुरी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेल्या कामांची आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. दिल्ली राज्य सरकारने आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या विविध केंद्रीय योजना लागू न केल्याबद्दल बिधुरी यांनी आपवर टीका केली. तसंच, त्यांनी दिल्ली आणि परिसरातल्या रस्त्यांची स्थिती, वायू प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतूक सुविधामधल्या समस्यांचा मुद्दाही उपस्थित केला.