ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचं जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं सुरू असलेलं उपोषण आज स्थगित करण्यात आलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहर परिषदेत हाके यांनी ही घोषणा केली. आपल्या दोन मागण्या मान्य झाल्या असून मराठा आरक्षणासाठीचा सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश सर्वपक्षीय बैठक झाल्याशिवाय काढणार नाही, असं आश्वासन आपल्याला सरकारने दिल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. तसंच खोटी कुणबी प्रमाणपत्रं देणारे आणि घेणारे या दोघांवरही कारवाई करण्याचं आश्वासन सरकारने दिल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षण प्रकरणी लाखो हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. या हरकतींवर काय कारवाई झाली याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही हाके यांनी केली.
दरम्यान, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं तसंच लोकसभा आणि विधानसभेत ओबीसींना आरक्षण द्यावं, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी उपोषणस्थळी बोलताना केली. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातनिहाय जनगणनेला पाठिंबा दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.