विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित, अर्थात स्टेम क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री पश्चिम विभाग आणि इंडियन विमेन नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने स्पार्क या कार्यक्रमाचा प्रारंभ आज मुंबईत करण्यात आला. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे.
महिलांना स्टेममध्ये रस निर्माण करणं, या विषयांशी संबंधित कौशल्यं वाढवणं आणि या क्षेत्रात गती असणाऱ्या महिलांना कामाच्या संधी उपलब्ध करून देणं यासाठी शाळांमध्ये काम, शिष्यवृत्ती निधी आणि प्लेसमेंट सेल निर्माण करण्याची ही योजना आहे. नंतर स्टेममध्ये येऊ पाहणाऱ्या पुढच्या पिढीतल्या मुली आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात एक चर्चासत्रही पार पडलं. विविध कंपन्या आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी याविषयी आपापले विचार आणि आपण उचललेली पावलं या चर्चेतून मांडली.