देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट असून, डोंगराळ भागात हिमवृष्टी तर सखल भागात पावसाचा जोर आहे. जम्मू – काश्मीर, लडाख या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय महामार्गावर बर्फ साचल्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक रस्त्यांमुळे बंद ठेवण्यात आली आहे. श्रीनगर तसंच इतर विविध पर्यटनस्थळांवर पर्यटक हिमवृष्टीचा आनंद लुटताना दिसताहेत. मात्र प्रवास सुरु करण्यापूर्वी रस्ते आणि महामार्गांची स्थिती जाणून घ्यावी अशा सूचना वाहतूक विभागानं दिल्या आहेत.
लडाखमधेही हिमवृष्टी होत असून कारगिल – श्रीनगर आणि कारगिल –झंस्कार या दोन्ही महामार्गांवर बर्फ साचल्यानं वाहतूक बंद पडली आहे. लडाख प्रशासनानं चोवीस तास चालणारा नियंत्रण कक्ष सुरु केला असून रस्त्यांवरचं बर्फ लौकरातलौकर हटवण्यात येईल असं कारगिलचे उप आयुक्त श्रीकांत सुसे यांनी सांगितलं.
हिमाचल प्रदेशातही डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि सखल भागात पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून मुख्यमहामार्गांवर बर्फ साचल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. राजधानी शिमला सहित किन्नौर, लाहौल स्फिती परिसरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. रस्त्यांवर बर्फ साचल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी आणि स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं वाहन करण्यात आलं आहे.
उत्तराखंडमधेही अनेक ठिकाणी हिमवृष्टी झाली असून सखल भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे.