नाशिक जिल्ह्याला राज्याचं धार्मिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिने नाशिक – त्र्यंबकेश्वर धार्मिक कॉरिडोरची निर्मिती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे २०२७ मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पूर्वतयारीविषयी आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातल्या धार्मिक परंपरेचे दर्शन घडावं, यासाठी नाशिकजवळ मोठं महाकुंभ तयार करावं. यामध्ये देशातली तसंच राज्यातली मंदिरं, तिर्थक्षेत्रं, सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल, असे मोठे संमेलन केंद्र उभारावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
गोदावरी नदीकाठाच्या विकासाला प्रोत्साहन द्यावं, प्रमुख मंदिरांमध्ये राहण्याची व्यवस्था करावी, साधुग्रामसाठी अतिरिक्त जमीन संपादित करण्यात यावी तसंच संबंधित जागांवरची बेकायदेशीर अतिक्रमणं हटवावीत असे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.