कोलकाता इथल्या महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणासंबंधी समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल पीडित महिला संदर्भातील नाव , छायाचित्र आणि व्हीडियो तत्काळ काढून टाकण्यात यावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे आदेश दिले. देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाला तीन आठवड्यात हंगामी अहवाल आणि दोन महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देशही सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं यावेळी दिले. या राष्ट्रीय कृती दलात देशातील निवडक डॉक्टर्स राहणार असून ते डॉक्टर्स , महिला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना सुचवणार आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण नीट न हातळल्याबद्दल पश्चिम बंगाल सरकार आणि संबंधित रुग्णालय प्रशासन यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली.
Site Admin | August 21, 2024 9:43 AM | Kolkata Rape Case | Supreme Court