डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कोलकातामधल्या डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ डॉक्टरांचा देशव्यापी संप

कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  या घटनेच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेनं आज एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. 

 

देशभरात विविध भागात डॉक्टर संघटनेनं संपाला प्रतिसाद दिला असून सामान्य रुग्णालयात रुग्णसेवा बंद आहेत. मुंबईत जे.जे. रुग्णालयासह अन्य रुग्णालयांचे डॉक्टर आणि वैद्यकीय संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत.

 

पुण्यातल्या ससून रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनीही यात सहभाग घेतला. यामुळं बाह्य रुग्ण विभागातल्या रुग्णांची संख्या कमी झाली तसंच शस्त्रक्रियांच्या संख्येतही घट झाली. अत्यावश्यक विभागातली सेवा, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. 

 

छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांतीचौकात निदर्शनं झाली. शहरातील काही खासगी वैद्यकीय रुग्णालयं, वैद्यकीय व्यावसायिक आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मार्ड संघटना या संपात सहभागी झाली आहे.

 

हिंगोलीत डॉक्टर हेडगेवार स्मृती रुग्ण सेवा मंडळ आणि दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तर धुळ्यात श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी ठिय्या आंदोलन केलं.  नांदेड जिल्ह्यात निमा, मार्ड आदी संघटनांच्या वतीने आज निषेध मोर्चा काढण्यात आला. 

 

भंडारा, यवतमाळमध्ये डॉक्टरांच्या विविध संघटनांनी मूकमोर्चा काढला. नागपूर इथंही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आज निषेध आंदोलन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला. 

 

याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय स्तरावर एक कडक कायदा तयार करण्यावर यावेळी चर्चा झाली. 

 

डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे. सरकार त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कारवाई करत असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी कटीबद्ध आहे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा