ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवावर आज आळंदी इथं अंत्यसंस्कार झाले. काल रात्री त्यांचं पुण्यात निधन झालं होतं. ते ८९ वर्षांचे होते. साखरे महाराज यांचा शिष्य परिवार देशात, तसंच परदेशातही आहे. राज्य सरकारनं २०१८ या वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं होतं.
किसन महाराज साखरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. साखरे यांची कार्यसाधना पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तेजोमय राहील, अशा शब्दात फडनवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. तर साखरे महाराज यांच्या निधनानं अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला आहे, असं पवार यांनी आदरांजली व्यक्त करताना म्हटलं आहे.