ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकुर यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. डॉक्टर ठाकूर तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत होते. पुणे डेलीमध्ये उपसंपादक आणि यूएनआय या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिलं. इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्वर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स या नियतकालिकांसाठीही त्यांनी काम केलं.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागात प्राध्यापक म्हणून असताना त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आणि नव्या संशोधनांना चालना दिली. डॉक्टर ठाकूर यांनी भारतातील वृत्तपत्रांच्या वेब आवृत्त्या या विषयावर पीएचडी संशोधन केलं. अनेक शोधनिबंधांबरोबरच न्यूजपेपर इंग्लिश, हँडबुक ऑन प्रिंट जर्नालिझम आदी पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलं. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच देहदान करण्यात आलं.