ऑलिंपिकमधे दोन पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश, पॅरा ॲथलिट प्रवीणकुमार आणि हॉकीपटू हरमनप्रित सिंह यांना यंदाचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार, तर नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात पॅरा ॲथलिट सचिन खिलारी याचाही समावेश आहे. पॅरा जलतरणपटू मुरलीकांत राजाराम पेटकर आणि ॲथलिट सुचा सिंह यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं आज पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली. राष्ट्रपती भवनात १७ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केलं जाईल.
दरम्यान, पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंचं उपमुख्यमंत्री तसंच राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.