लोणावळा नगरपरिषदेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. लोणावळा, खंडाळा शहरांच्या भविष्यातील लोकसंख्येचा, पर्यटकांचा विचार करून खंडाळ्यासाठी ५ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि लोणावळा शहरासाठी नऊ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीनं उभारण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत दिले. भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपुलाचे उर्वरित काम नगरपरिषद आणि रेल्वे प्राधिकरणाकडून तातडीनं करून घ्यावे, त्यातील भूसंपादनाच्या कामासाठी राज्य सरकारतर्फे १५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असंही पवार यांनी सांगितलं.
लोणावळा शहराचा विकास आराखडा अंतिम करताना हनुमान टेकडी परिसरातील म्हाडा घरकुलांना वाढीव एफएसआय देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना नगरविकास सचिवांना दिल्या.शहरांतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या लोणावळा शहरातील दोन किलोमीटर मार्गाचं नगरपरिषदेच्या निधीतून रुंदीकरणाच्या प्रस्तावाला रस्ते विकास महामंडळानं ना हरकत प्रमाणपत्र द्यावं, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.