जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन महत्त्वाची भूमिका बजावत असून, मानवतेचे बंध निर्माण करण्याचं काम पर्यटनाच्या माध्यमातून होतं, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. जागतिक पर्यटन दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, पर्यटन राज्य मंत्री सुरेश गोपी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पर्यटन मंत्रालयातर्फे दिले जाणारे उत्कृष्ट पर्यटन ग्राम पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.
विविध आठ श्रेणींमध्ये 36 गावांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात कृषी पर्यटनासाठीचा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे गावाला मिळाला. देश पातळीरील ही स्पर्धा दूरस्थ पद्धतीनं घेण्यात आली; त्यामध्ये गावातल्या उपक्रमांसंदर्भातलं सादरीकरण कर्दे गावाचे सरपंच सचिन तोडणकर यांनी केलं होतं. हा पुरस्कार संपूर्ण कोकणातल्या कृषी पर्यटनाचं प्रतिनिधित्व करतो, अशी भावना त्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली