अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसराला निसर्गाचं वरदान लाभलं आहे. इथला पाऊस अनुभवण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आणि परराज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणावर भंडारदर्याला भेट देत असतात. वर्षा ऋतूमध्ये कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात कोसळणारे अनेक लहान मोठे धबधबे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असतं. आता पावसाळा संपल्यानंतर इथं फुलांचा उत्सव सुरू झाला आहे. हिरवे डोंगर आणि त्यावर अनेकविध रंगांची सुंदर फुलं आता पर्यटकांना आकर्षून घेत आहेत. सोनकीच्या फुलांनी संपूर्ण रतनगड पिवळसर झाला आहे; त्यातच घोडेधारीजवळ कारवी फुलल्याने निसर्ग अधिकच खुलून दिसत आहे. अलंगगडालाही कारवीच्या फुलांनी वेढा टाकला आहे. सोनकी, सोनका, रानतेरडा, पंधाडा, पिपडा, कुर्डू, शिळंद, गाजरी अशा रानफुलांचा हा रंगोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं भंडारदरा भागाकडे वळत आहेत.
Site Admin | October 19, 2024 10:49 AM | Ahilyanagar | Akole