देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज पदभार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खन्ना यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी १९८३ मध्ये वकिलीची सुरुवात केली. त्यांनी जानेवारी २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केलं आहे. २००५ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक बाँड योजना रद्द करणे, कलम ३७० रद्द करणे यांसारखे अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग होता.