डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची घोषणा

बीड आणि परभणी इथं गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते विधानसभेत उत्तर देत होते. परभणी इथं झालेली घटना कोणत्याही समुदायांमधल्या वैरभावनेतून झाली नाही. या प्रकरणात अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता, असंही त्यांनी नमूद केलं. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.

 

तसंच या घटनेनंतर मृत्यू झालेले आंबेडकरवादी कार्यकर्ते विजय वाकोडे यांनी या घटनेच्या वेळी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असं सांगून त्यांच्या कुटुंबालाही पाच लाख रुपयांची मदत फडणवीस यांनी जाहीर केली. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आणि दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या ५१ जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणी अतिरिक्त बळाचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घोडबांड यांना निलंबित करून त्यांची चौकशी केली जाईल,असं त्यांनी सांगितलं.

 

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण तेवढ्यापुरतं मर्यादित नसून याची पाळंमुळं खोदावी लागतील, असं फडणवीस यांनी सांगितलं. संतोष जाधव यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये मदत देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.

 

या प्रकरणाची चौकशी दोन प्रकारे केली जाईल.विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अंतर्गत विशेष तपास समिती, तसंच न्यायालयीन चौकशीही केली जाईल,असं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका कुचराईची असून बीडच्या पोलीस आयुक्तांची बदली करणार असल्याचं फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
याच मुद्द्यावर मुख्यमंत्री विधानपरिषदेत निवेदन देत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा