चीनच्या कथित अनुचित व्यापारप्रथांवर तोडगा काढण्याचा निश्चय जी सेव्हन देशांनी केला आहे. जी सेव्हन देशांच्या शिखरपरिषदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात हा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात आला आहे. युक्रेनविरुद्धच्या लष्करी कारवायांसाठी रशियाला शस्त्रास्त्र खरेदीसाठी मदत पुरवणाऱ्या चिनी वित्तीय संस्थांविरुद्ध पावलं उचलण्याचा इशाराही या देशांनी दिला आहे. याचा हेतू चीनच्या आर्थिक प्रगतीला खीळ घालण्याचा नसून व्यापार उदिमातल्या उचित प्रथांचं संरक्षण करण्याचा आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे. भारतापासून मध्य युरोपापर्यंत रस्तेबांधणीसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासाला या निवेदनात समर्थन दिलं आहे. तसंच हिंद- प्रशांत महासागर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत भयमुक्त वावरालाही पाठिंबा दिला आहे. गाझामधे युद्धग्रस्तांना मदत करण्यासाठी विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्र आणि इतर मानवतावादी संस्था संघटनांना ये-जा करता आली पाहिजे असंही निवेदनात ठासून सांगण्यात आलं आहे.
Site Admin | June 16, 2024 12:53 PM | चीन | जी सेव्हन
जी सेव्हन देशांचा चीनच्या कथित अनुचित व्यापारप्रथांवर तोडगा काढण्याचा निश्चय
