झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आपापल्या पक्षांच्या उमेदवारांकरता मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमधे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गिरीदिह, बोकारो आणि गांडे इथं प्रचारसभा घेतल्या. झारखंडमधलं हेमंत सोरेन सरकार बांगलादेशी घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपाला सत्ता मिळाली तर घुसखोरांना घालवण्यासाठी कायदा केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दुमका इथं सभा घेतली. झारखंडच्या मागासलेपणासाठी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रकाश यादव यांनी जामतारा इथं प्रचारसभा घेतली. राजकीय पक्षांनी मुद्यांवर आधारीत सकारात्मक राजकारणाचा अंगीकार केला पाहिजे, असं ते म्हणाले.
काँग्रेस, ऑल झारखंड स्टुडंट युनियन आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनीही झारखंडच्या विविध भागात प्रचारसभा घेतल्या. तसंच रोड शो केले. दुसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान येत्या २० तारखेला होणार आहे. मतमोजणी येत्या २३ तारखेला होईल.