छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात १५ हजार ४६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, पाणी साठा साडे ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आवक वाढल्यावर विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे.
भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने धरणाच्या ३३ दरवाज्यांपैकी २५ दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संततधार पाऊस कायम राहिला तर आणखी पाणी सोडण्यात येईल असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे.
गोंदिया जिल्ह्यात काल रात्री ढगफुटी सारखा पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्यालगतचं घर पाण्यात कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला घराच्या ढिगाऱ्याखाळी अडकल्याचं वृत्त आहे. बचाव कार्य सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात सूर्याटोला भागाला बांध तलाव ओसंडून वाहू लागल्यामुळे अनेक घरात पाणी शिरलं आहे तर ग्रामीण भागात नदी नाले ओसंडून वाहू लागले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काल रात्री पासून सुरु झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे.