जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणारा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी आज गदारोळ घातला. या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
उपमुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सुरेंद्र कुमार चौधरी यांनी काल हा प्रस्ताव सभागृहात मांडला आणि तो आवाजी मतदानानं मंजूर केला. विधानसभेच्या कामकाजाला आज सकाळी सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या आमदारांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवत हे कृत्य घटनाबाह्य असल्याचं सांगितलं. विरोधी पक्षातील काही सदस्य सभागृहाच्या मध्यभागी जाऊन निदर्शन करायला सुरुवात केली. सभापती अब्दुल रहीम राठर यांच्या सूचनेवरून सुरक्षा रक्षकांनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना बाहेर काढलं. त्यानंतरही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं सभापतींनी सुरुवातीला १५ मिनिटांसाठी आणि त्यानंतर दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं.