जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे सूरत इथे, ‘जल संचय जन भागीदारी’ या अभियानाचा प्रारंभ दूरस्थ पद्धतीने केल्यानंतर ते बोलत होते. भारतात पाण्याला ईश्वराचं रूप मानलं असून पाण्याच्या साठवणीच्या अनेक शास्त्रशुद्ध पद्धती भारतात परंपरेने विकसित झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई या समस्यांवर जलसंचयानेच तोडगा निघू शकतो असं ते म्हणाले.
सध्या सुरू असलेल्या ‘जल शक्ति अभियानाशी’ हे अभियान संलग्न असणार आहे. या अभियानाद्वारे गुजरात राज्यातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योगसंस्थाना पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण अर्थात ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा उभारण्यासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाअंतर्गत, गुजरातमध्ये सामुदायिक भागीदारीतून सुमारे २४ हजार ८०० बांधकामं केली जात आहेत. पावसाच्या पाण्याची साठवण वाढवण्यासाठी तसंच पाण्याची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.