आपल्या देशाची गौरवशाली वाटचाल राज्यघटनेतून मिळालेल्या मार्गदर्शनाशिवाय शक्य झाली नसती असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केले त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय म्हणून आपली राज्यघटना ही आपल्या सामूहिक अस्मितेचा मूलभूत आधार आहे असे त्या म्हणाल्या.
गेली ७५ वर्षे राज्यघटनेने आपल्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला आहे. बाबासाहेब आंबेडकर, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, इतर मान्यवर सदस्य, राज्यघटना निर्मितीशी संबंधित विविध अधिकारी आणि इतरांच्या मेहनतीमुळे ही महान घटना आपल्याला लाभली, हा दिवस या सगळ्यांचे आभार मानण्याचा दिवस आहे. असे त्या म्हणाल्या.
यावेळी राष्ट्रपतीनी केंद्र सरकार लोककल्याण आणि देशाच्या विकासासाठी करत असलेल्या विविध कामांविषयी देशवासियांना सांगितलं. यामुळे भारताच्या प्रजासत्ताकाच्या ७५ वर्षांच्या दीर्घ कालखंडात भारताचा सुप्त राहिलेला आत्मा आता पुन्हा जागृत झाला असल्याचे त्या म्हणाल्या.
केंद्र सरकारने धाडसी दूरदृष्टीने निर्णय घेतले आहेत. नव्याने आणलेले फौजदारी कायदे हा सर्वात उल्लेखनीय निर्णय आहे. या कायद्यांमधून शिक्षेपेक्षा न्याय देण्याची भावना फौजदारी न्यायव्यवस्थेच्या केंद्रस्थानी ठेवली गेली आहे असे त्या म्हणाल्या. देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याचे संसदेत मांडण्यात आलेल्या विधेयकामुळेही प्रशासनातील सातत्य वाढू शकते, धोरण लकवा कमी होऊ शकतो, संसाधांचा पुरेपूर वापर करण्याची संधी मिळेल आणि वित्तीय भार कमी होऊ शकेल असे त्या म्हणाल्या.
आपली भाषिक विविधता आणि वारसा जपण्यासाठीही केंद्र सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.आजची युवा पिढीच उद्याचा भारत घडवणार आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रतिभेला वाव देण्याकरता सरकारने शिक्षणातली गुंतवणूक वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय तसेच वैयक्तिक अशा आपल्या सर्वच व्यवहांरात नैतिकतेला सर्वोच्च स्थान देणे हेच आपल्या आपल्या संस्कृतीचे सार असल्याचे सांगत, प्रत्येकाप्रती करुणाभाव बाळगण्याचा संदेश महात्मा गांधी यांनी आपल्याला दिला होता. या संदेशाचा अवलंब करण्याचा संकल्प आपण आजच्या दिवशी करूया असे आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केले.