प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं आवश्यक असून, त्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात त्या बोलत होत्या. प्रत्येक क्षेत्रात महिलांची सक्रीय भागीदारी वाढवण्यासाठी बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं त्या म्हणाल्या. राज्य सरकार महिलांचं आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी, महिलांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करावं, आपल्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी स्वत:कडे देखील लक्ष देण्याचं आवाहन केलं.
वीरमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले, संत बहिणाबाई, कवयित्री बहिणाबाई चौधरी, समाज सेविका सिंधुताई सपकाळ, यांच्या कार्याचा आपल्या भाषणात उल्लेख करत राष्ट्रपतींनी, अशा महान महिलांकडून प्रेरणा घेऊन महिला कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरणासह शेतकरी आणि युवकांसाठी असलेल्या अनेक योजनांचा उल्लेख करत, त्यांनी या योजनांविषयी समाधान व्यक्त केलं.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच गिरीष महाजन, संजय बनसोडे, आदिती तटकरे हे मंत्रिमंडळ सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या लाभार्थींना लाभाचं वाटप करण्यात आलं.
लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती स्वत: आल्या याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत एका महिलेला तीन गॅस सिलिंडर देणार असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, राज्य सरकारच्या महिला आणि शेतकऱ्यांसाठीच्या इतर योजनांची माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सरकार वाटचाल करत असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. राज्यात एक कोटी लखपती दीदी तयार करणार असून, लाडकी बहिण योजनेचं राजकारण न करण्याचं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं. महिला सशक्त झाल्या, तरच आपल्या देशाचा विकास होईल, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. लातूर जिल्ह्यात पाच लाखाहून अधिक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
उदगीर तालुक्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची, तसंच उदगीर इथं वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची मागणी मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी केली. उदगीर इथं उभारण्यात आलेल्या बुद्ध विहाराचं राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण झालं. राष्ट्रपती मुर्मू यांनी आज नांदेडच्या तख्त श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं आणि लंगरची पाहणी केली. नंतर त्या दिल्लीला रवाना झाल्या.