प्रधानमंत्री जनधन बँक खातं तसंच बचत खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. खात्यात किमान रक्कम शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांकडून बँकेनं दंड वसूल केल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या.
राज्यसभेत आजही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा सुरु राहिली. सरकारनं अनेक कोटी कुटुंबाना एलईडी बल्ब पुरवल्यामुळे ४ हजार ५०० कोटी युनिट विजेची बचत झाल्याचं भाजपाचे खासदार अमर पाल मौर्य यांनी सदनात सांगितलं. सरकारनं प्रधानमंत्री सूर्यघर – मोफत वीज योजनेत १ कोटी कुटुंबाना जोडण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून १ कोटी २८ लाखांहून अधिक कुटुंबांनी सोलर रुफटॉपसाठी नावनोंदणी केली आहे असंही त्यांनी सांगितलं.
कृषिक्षेत्रात सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेली प्रधानमंत्री कुसुम योजना आपलं उद्दिष्ट गाठण्यात अपयशी ठरली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौझिया खान यांनी केली.
गेल्या १० वर्षात सरकारनं १०६ नवीन जलमार्गांची राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषणा केल्याचं बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यसभेत सांगितलं. गेल्या १० वर्षात जलमार्गानं होणाऱ्या मालवाहतूकीत ६ पट वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं.