इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि एस आर ओ- डेमो सॅट प्रवासी उपग्रह आज सकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्याची माहिती, इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी दिली . एसएसएलव्हीचं हे तिसरं प्रक्षेपण आहे. याबरोबरंच भारत, सूक्ष्म, लहान आणि नॅनो उपग्रह पाठवायला सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे, असंही ते म्हणाले.
पाळत ठेवणं, आपत्ती निरीक्षण, आग शोधणं, ज्वालामुखीची, महासागराच्या पृष्ठभागावरील वारे, मातीतील ओलावा, आदी घडामोडींची आगाऊ माहिती या उपग्रहाद्वारे दिली जाईल. दोन्ही उपग्रहांना ४७५ किमीच्या वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आलं आहे. नवीन प्रक्षेपण वाहने डी-1, डी-2 आणि डी-3 विकसित केल्यामुळे अंतराळात आणखी नवीन मार्ग शोधण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढला आहे, असंही सोमनाथ यांनी सांगितलं. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि अन्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.