इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था यंदाचा स्वातंत्र्य दिवस पृथ्वी निरीक्षक उपग्रह प्रक्षेपित करून साजरा करणार आहे. १५ ऑगस्ट रोजी श्रीहरीकोटा इथून सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी इस्रोनं विकसित केलेला लघु उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं EoS 08 हा पृथ्वी निरीक्षक उपग्रह अवकाशात सोडला जाईल. त्यानंतर तो पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावेल. हा उपग्रह आपत्ती निरीक्षण, रिमोट सेन्सिंग, आग आणि पूर शोध आणि अतिनील किरण मापनासाठी उपयुक्त असलेल्या प्रगत तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे.
उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरला जाणारा लघु प्रक्षेपक कमी खर्चात तयार झाला असून, त्यामध्ये एकाच वेळी अनेक सूक्ष्म उपग्रह सामावून घेण्याची, तसंच किमान पायाभूत सुविधांसह उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. हा प्रक्षेपक ५०० किलो वजनाचा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत ५०० किलोमीटर अंतरापर्यंत नेऊ शकतो. १५ ऑगस्ट रोजी चाचणी प्रक्षेपण यशस्वी झाल्यावर हा प्रक्षेपक खासगी क्षेत्राकडे उत्पादनासाठी हस्तांतरित केला जाईल असं इस्रोच्या सूत्रांनी सांगितलं.