भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज पुष्पक या अग्निबाणाचं तिसऱ्यांदा यशस्वी परीक्षण केलं. कर्नाटकच्या चित्रदुर्ग एअरोनॉटिकल टेस्ट रेंज एटीआर इथे हे परीक्षण झालं. आज सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी वायू सेनेच्या चिनुक हेलिकॉप्टरमधून पुष्पकला ४ पूर्णांक ५ दशांश किलोमीटर उंचीवरून सोडण्यात आलं. प्रक्षेपणानंतर अर्ध्या तासाने हे यान युद्धसराव पूर्ण करून स्वयंचलित पद्धतीनं पुन्हा रनवेवर उतरलं.
पुष्पक हे पुनर्वापर पद्धतीचं यान असून त्याच्या साहाय्यानं क्षेपणास्त्र एकाहून अधिक वेळा प्रक्षेपित होतील. इस्रो, भारतीय वायू सेना, आयआयटी कानपूर, भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यासह अनेक महत्त्वाच्या संस्थांचा या यानाच्या निर्मिती आणि परीक्षणात सहभाग आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी या मोहिमेच्या यशस्वी परीक्षणासाठी सहकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.