भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो गगनयान कार्यक्रमांतर्गत पहिल्या मानवरहित मोहिमेसाठी सज्ज होत आहे, असं विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे संचालक डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितलं. ते काल बेंगळुरू इथं आठव्या बेंगळुरू अंतरिक्ष प्रदर्शनाच्या निमित्तानं प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मानवरहित मोहिमेसाठी ऑर्बिटल मॉड्यूल तयार होत असून लवकरच ते श्रीहरिकोटा इथं हलवले जाईल असंही त्यांनी सांगितलं. ही मोहीम या वर्षाच्या अखेरीस नियोजित आहे. नुकत्याच झालेल्या पुष्पक प्रक्षेपण वाहनाच्या यशस्वी चाचणीनंतर, इस्रो पुन्हा वापरता येण्याजोग्या अंतराळ वाहनाच्या पॅराशूट प्रणालीच्या चाचणीसाठी आता सज्ज होत आहे,अशी माहितीही डॉक्टर उन्नीकृष्णन यांनी दिली.