इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था भारतीय अंतराळवीराला चंद्राच्या पृष्ठभागावर घेऊन जाण्याच्या आणि त्याला सुरक्षितपणे परत आणण्याच्या मोहिमेवर काम करत असल्याचं इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या असून, २०४० सालापर्यंत हे उद्दिष्ट गाठण्यात इस्रोला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. २०३० सालापर्यंत भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असेल, असं ते म्हणाले. ते काल जालंधर इथं एका शैक्षणिक संस्थेनं आयोजित केलेल्या ‘छात्र संसद’ कार्यक्रमात बोलत होते.
अंतराळात प्रदीर्घ काळ काम करून सुरक्षितपणे परतलेले नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचं उदाहरण भारताच्या अंतराळ मोहिमेसाठी प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले.
भारताकडे अमाप संधी आहेत यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा, आणि विकसित भारत घडवण्यासाठी आपल्या आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेनं योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.