हिजबुल्लाह या लेबनॉन मध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी गटानं काल रात्री इस्राएलमधल्या बीट हिलेल शहरावर हल्ला केला. हिजबुल्लाह गटाला इराणचं पाठबळ असून पॅलेस्टाइनी नागरिकांच्या विरुद्ध इस्राइलनं केलेल्या हल्ल्याला तसंच इस्राइलनं केफर केला आणि देर सिरियान या लेबनीज शहरांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलल्याचं हिजबुल्लाह गटाचं म्हणणं आहे. त्याआधी इस्राइलनं काल हिजबुल्लाह गटावर गोळीबार केला होता आणि आपल्या नियंत्रणाखाली असलेला पश्चिमी भाग आणि गाझा मध्ये एका शाळेवर हल्ला केला होता.
या हल्ल्यात किमान १७ जणांचा मृत्यू झाला असं हमास शासित प्रदेशाच्या नागरी संरक्षण संस्थेनं सांगितलं. या आठवड्याच्या सुरुवातीला इस्राईलनं लेबनॉनची राजधानी बेरूट इथं हिजबुल्लाहच्या सैन्य प्रमुखाची हत्या केल्यानंतर अवघ्या काही तासातच हमासचा नेता इस्माइल हानिये याच्या हत्येनंतर पश्चिम आशिया क्षेत्रातलं वातावरण अधिक तणावग्रस्त झालं.