गाझा पट्टीचा दक्षिणेकडचा भाग आणि मानवतावादी क्षेत्र म्हणून निर्धारित करण्यात आलेल्या प्रदेशात इस्राएलनं केलेल्या हल्ल्यात किमान ४० नागरिकांचा मृत्यू झाला असून, ६० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, असं हमास या संघटनेच्या नागरी संरक्षण विभागानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
तर, खान युनिस भागात हमास या अतिरेकी संघटनेच्या केंद्रावर आपल्या वायुदलानं हल्ला केला असून, स्थानिक नागरिकांचा त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचं इस्राएलच्या लष्करानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
इस्रायलनं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या प्रदेशात लष्करी मोहीम सुरू केल्यापासून हजारो विस्थापित पॅलेस्टिनीं नागरिकांनी खान युनिस भागात आश्रय घेतला आहे. तेव्हापासून गाझा पट्टीत 40 हजार 900 पेक्षा जास्त नागरिक मारले गेल्याचं या प्रदेशातल्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.