इस्रायल आणि हिजबुल्लामधल्या संघर्षाने आता गंभीर वळण घेतलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले चढवले आहेत आणि त्यात वाढ करण्याचा इशारा दिला आहे. यातून त्या भागात युद्धाचे ढग दाटू लागल्याची चिंता व्यक्त होत आहे. इस्रायलने लेबननवर मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले केले. या हल्ल्यांनंतर इस्रायली लष्कराने उत्तरेकडील नागरिकांना बाहेर न पडण्याचे तसंच शक्यतो निवाऱ्यांच्या जवळपास रहाण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटात दगावलेल्यांची संख्या ३७ आणि जखमींची संख्या २ हजार ९३१ वर पोचल्याची माहिती लेबनन आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. या स्फोटाची जबाबदारी इस्रायली लष्कराने नाकारली आहे.