इस्रायल आणि हमास यांच्यातल्या सहा आठवड्यांचा युद्धविराम आज तीन तासांच्या विलंबानं सुरू झाला. सध्या सुरू असलेला संघर्ष निवळण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वपूर्ण पाऊल असून युद्धविरामाची सुरूवात झाल्याच्या वृत्ताला आज मध्यस्थ देश कतारनं पुष्टी दिली आणि सुरुवातीला सुटका होणाऱ्या तीन बंदिवानांपैकी काहीजण परदेशी नागरिक असल्याचं सांगितलं.
सुटका होणाऱ्या ओलिसांची यादी मिळाली असून यासंबंधीच्या तपशीलांची तपासणी सुरक्षायंत्रणा करत आहेत असं इस्रायलचे प्रधानमंत्री नेत्यान्याहू यांनी समाजमाध्यमावर सांगितलं आहे. येत्या सात दिवसांत आणखी चार महिला बंदिवानांची सुटका होऊ शकते असं इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या करारानुसार दोन्ही बाजूंनी बंदिवानांचं प्रत्यर्पण होणार आहे.
दरम्यान, युद्धविराम हा टप्प्याटप्प्याने होणाऱ्या कराराचा पहिला टप्पा असून, आमच्या बंदिवानांना परत आणण्याची आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासनं केलेल्या हत्याकांडाची पुनरावृत्ती होऊ नये याची निश्चिती करण्याची क्षमता या करारामधे आहे, असं इस्रायलचे भारतातील राजदूत रियुवेन अजर यांनी सांगितलं.