आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून घेतल्या जाणार आहेत. प्रदेश काँग्रेसनं इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून १ हजार ६८८ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्याच्या मुलाखतींसाठी काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे.
हे नेते दिनांक १ ते ८ ॲाक्टोबरपर्यंत आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील, आणि १० ॲाक्टोबरपर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करतील. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही माहिती दिली.