जागतिक महिला दिन राज्यात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त धुळे जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणार्या २१ महिला पोलीस अंमलदारांना कॉप ऑफ द मंथ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
परभणी जिल्ह्यात दैठणा इथल्या जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रशालेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर गोंदियात सायकल संडे ग्रुपच्या महिलांनी शहरात सायकल रॅली काढली. या सायकल रॅलीत गृह पोलीस अधीक्षक आणि उप विभागीय महिला पोलीस अधिकारी तसंच तरुणींनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली.
अकोला शहरात वॉकेथॉनद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. धाराशिवमधे महिला दिनी योग प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. योग शिकून महिलांनी निरोगी राहण्याच्या संदेश यावेळी देण्यात आला.
सांगलीमध्ये जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.