जागतिक महिला दिनी आज राज्यात विविध कार्यक्रम झाले.
पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वानवडी भागात दुचाकी फेरी काढली. या फेरीत २३२ महिला अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्या.
जागतिक महिला दिनी गोंदिया शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार एका दिवसाकरता महिला पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक आफ्रीदीन बिजली यांनी पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी महिला सहकाऱ्यांनी साथ दिली.
अहिल्यानगर मध्ये हिवरेबाजार इथं महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर राहाता पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार आज महिला पोलीसांनी हाताळला.
जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या आष्टी इथं महिला सरपंचांच्या अध्यक्षतेखाली विशेष महिला ग्रामसभा घेण्यात आली. महिलांसाठी जाचक असणाऱ्या प्रथा बंद करण्याचा महत्त्वाचा ठराव या ग्रामसभेत घेण्यात आला.
दारिद्र्य रेषेखालील आणि गरजू महिलांना आत्मनिर्भर होता यावं यासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या व्हिजुअल केंद्रा मार्फत जागतिक महिला दिनी शिलाई मशिन, विणकाम साहित्य, खाद्यपदार्थ प्रक्रिया करणारी उपकरणं, आदी साहित्यांचं वाटप करण्यात आलं.
सांगलीत जिल्हा परिषदेनं महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.
स्त्रियांनी केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता उद्योग, समाजसेवा आणि प्रशासनातही मोठी झेप घ्यावी, असं आवाहन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. धुळ्यात आजपासून महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या सरस प्रदर्शनाला सुरुवात झाली.