मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालही पुढील शंभर दिवसांत करायच्या कामांच्या अनुषंगानं विविध विभागांची आढावा बैठक घेतली. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या कामांचा आढावा घेताना जल जीवन मिशन योजनेची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. ही योजना संपूर्णपणे सौरउर्जेवर चालवावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सहकार विभागाचा आढावादेखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा, रिमोट सेन्सिंग आणि जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा वापर करावा, असं त्यांनी सांगितलं.
राज्यात विविध सेवा सहकारी संस्थांमध्ये तीनशे ते हजार मेट्रीक टन क्षमतेची शंभर गोदामं बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पात्र निराधारांना लाभ मिळण्यात होणारा विलंब टाळण्यासाठी लाभ वितरण थेट लाभ हस्तांतरण पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या आढावा बैठकीत दिले.