लोकसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा सुरु राहिली. अर्थसंकल्पानं जनतेची घोर निराशा केली असून, यामध्ये पंजाबवर अन्याय झाल्याचा आरोप काँग्रेसचे चरणजित सिंह चन्नी यांनी यावेळी केला. पुरामुळे प्रभावित झालेल्या पंजाबच्या जनतेसाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद नसल्याचं ते म्हणाले. या टीकेला उत्तर देताना, महाराष्ट्राचा सर्वाधिक विकास एनडीए सरकारच्या काळात झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी सांगितलं.
हा अर्थसंकल्प केवळ कॉपी-पेस्ट अशा स्वरूपाचा असून, अलीकडच्या काळातला सर्वात जास्त फूट पडणारा अर्थसंकल्प असल्याचं टीएमसी चे खासदार सौगत रॉय म्हणाले. अर्थसंकल्पातले अनेक मुद्दे काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातून घेतले असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्याची योजना, ही पश्चिम बंगाल सरकारच्या योजनेची हुबेहुब प्रत असल्याचा दावा त्यांनी केला.