२०२४ हे वर्ष सुरू झाल्यापासूनच सगळ्यांना ज्याचे वेध लागले होते, त्या, क्रीडाविश्वात सगळ्यात प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा आज पॅरिसमध्ये रंगणार आहे. भारताकडून ११७ क्रीडापटूंचा चमू या स्पर्धेत सहभागी झाला आहे आणि हे क्रीडापटू ६९ विविध स्पर्धांमध्ये पदकाच्या शर्यतीत उतरणार आहेत. यंदा कोणाकोणाला पदकांनी गौरवलं जाणार, देशाचा तिरंगा कोणकोण उंचावणार, कोणकोण नवा इतिहास रचणार, या सगळ्याची उत्सुकता आपल्या मनात आहेच, संपूर्ण देशाच्या कोट्यवधी शुभेच्छा या क्रीडापटूंसोबत आहेत आणि त्याचवेळी मनात घोळतायत अशी काही नावं, ज्यांनी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं नाव आभाळाएवढं केलं, हो ना? त्यातलंच एक अतिशय महत्त्वाचं नाव, म्हणजे २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताला पहिलंवहिलं वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून देणारे अभिनव बिंद्रा, ज्यांना नुकतंच अत्यंत मानाच्या ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. श्रोतेहो, या यादीतली आणखी कोणती नावं आठवतायत तुम्हाला? कर्णम मल्लेश्वरी? आपल्या मराठी मातीतले खाशाबा जाधव? मेजर ध्यानचंद? सन १९००पासून ते २०२४पर्यंत, भारताच्या ऑलिम्पिकच्या प्रवासातल्या या अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती. आणि, हाच अतिशय रंजक, गौरवपूर्ण आणि वेगवान प्रवास आपण जाणून घेणार आहोत, गोष्ट भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाची…
आपण इतकी नावं घेतली. पण, नॉर्मन प्रिचर्ड हे नाव ऐकून काही क्लिक होतंय? या नामावलीची सुरुवात ज्यांनी करून दिली, ते, नॉर्मन प्रिचर्ड. कोलकात्याचा जन्म असलेल्या आणि अनेक वर्षं भारतात राहिलेल्या प्रिचर्ड यांनी सन १९००मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकहाती भारताचं प्रतिनिधित्व करत दोन रौप्यपदकांना गवसणी घातली- २०० मीटर धावणं आणि २०० मीटर अडथळ्यांची शर्यत. आता, त्यांना ब्रिटिश म्हणायचं, की भारतीय, याबद्दल ऑलिम्पिक इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत खरे, पण, भारताच्या ऑलिम्पिकप्रवासाची गोष्ट नॉर्मन प्रिचर्डशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हेही तितकंच खरं.
भारतानं पहिल्यांदा विविध क्रीडाप्रकारांसाठी पाच क्रीडापटूंचा चमू मैदानात उतरवला तो १९२०च्या अँटवर्प ऑलिम्पिकमध्ये, पण त्यांना पदक पटकावण्यात मात्र अपयश आलं. पुढच्याच ऑलिम्पिकमध्ये भारतानं टेनिसच्या कोर्टावर पदार्पण केलं.
त्यानंतरची, १९२८ची ॲमस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी ऐतिहासिक ठरली, ती भारताच्या हॉकी संघाच्या अतुलनीय घोडदौडीची सुरुवात म्हणून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात या संघानं २९ गोल केले आणि ऑलिम्पिक स्पर्धेतलं पहिलंवहिलं सुवर्णपदक भारताला मिळवून दिलं. हीच कामगिरी १९३२मध्ये लॉस अँजेलिसला आणि १९३६मध्ये बर्लिनला करून भारताच्या हॉकी संघानं गोल्डन हॅटट्रिक साधली आणि जगातल्या सर्वात प्रबळ हॉकी संघांपैकी एक म्हणून मानही मिळवला.
आता, या गोष्टीत एक मोठं स्थित्यंतर आलं. १९४० आणि १९४४मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्याच नाहीत आणि १९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे, पुढच्याच वर्षी झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारत पहिल्यांदाच स्वतंत्र देश म्हणून उतरला.
९ क्रीडाप्रकारांमध्ये ८६ क्रीडापटूंचा चमू भारतानं लंडनला पाठवला आणि हॉकी संघानं पुन्हा एकदा आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवत स्वतंत्र भारताला चौथं ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिलं. भारताचा तिरंगा पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या क्रीडासंकुलात मानानं फडकला. याच ऑलिम्पिकने भारताच्या हॉकीविश्वाला दिला एक नवा स्टार- बलबीर सिंह दोसांझ. पुढच्या सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही भारतीय संघानं आपली सुवर्ण घोडदौड कायम राखली.
स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्यावहिल्या, १९४८च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेची आणखी एक खासियत अशी, की भारतीय फुटबॉल संघानंही या स्पर्धेत दमदार पदार्पण केलं. लंडनच्या क्रिकलफील्ड स्टेडिमयवर १७ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत या संघानं फ्रान्सच्या तगड्या संघाला शेवटपर्यंत झुंजवलं, पण त्यांना २-१ अशी हार पत्करावी लागली. या स्पर्धेत भारताचे आठ फुटबॉलपटू अनवाणी पायांनी मैदानावर धावले होते.
त्यापुढची, १९५२ची हेलसिन्की ऑलिम्पिक स्पर्धाही भारतासाठी खास ठरली. हॉकी संघानं सुवर्णपदक जिंकलंच, शिवाय, आपल्या मराठी मातीतले कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी कास्यपदकाला गवसणी घातली. वैयक्तिक स्पर्धेत पदक पटकावणारे ते पहिले भारतीय ठरले. ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला हा मान याच वर्षी नीलिमा घोष यांनी पटकावला. अवघ्या १७व्या वर्षी त्यांनी १०० मीटर धावणं आणि ८० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत भाग घेतला. त्यांना पदक मिळवता आलं नाही, पण पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणा मात्र त्या नक्कीच ठरल्या.
१९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारताच्या फुटबॉल संघानं पुन्हा जोरदार मुसंडी मारली, पण त्यांचं कास्यपदक थोडक्यात हुकलं.
पुढची रोम ऑलिम्पिक भारतासाठी कडू-गोड होती, असं आपल्याला म्हणता येईल. या स्पर्धेत भारताच्या हॉकीतल्या घोडदौडीला थोडासा धक्का बसला, पाकिस्ताननं भारतावर मात केल्यानं आपल्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
शिवाय, फ्लाइंग सिख म्हणून ओळखले जाणारे धावपटू मिल्खा सिंह यांचं ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतलं कास्यपदक अवघ्या १ दशांश सेकंदानं हुकलं आणि आख्खा देश अक्षरशः हळहळला. पण, या शर्यतीत त्यांनी प्रस्थापित केलेला राष्ट्रीय विक्रम जवळपास पुढची चार दशकं अबाधित राहिला.
पुढे १९६४च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघानं जोरदार पुनरागमन करून हॉकीतलं सहावं सुवर्णपदक देशाला मिळवून दिलं. पण, पुढच्या दोन्ही ऑलिम्पिक्समध्ये त्यांना कास्यपदकावरच समाधान मानावं लागलं. त्यानंतरची, १९७६ची मॉन्ट्रियल ऑलिम्पिक भारताच्या हॉकी संघासाठी फारच धक्कादायक ठरली आणि संघ सातव्या स्थानावरच राहिला. या संघाची ही सर्वात वाईट कामगिरी होती. १९२४पासून पहिल्यांदाच भारताचा ऑलिम्पिक चमू पदकाविना मायदेशी परतला.
पण, खचून न जाता भारताच्या हॉकी संघानं पुढच्या, १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा सुवर्णपदकावर नाव कोरलं.
१९८०च्या दशकात भारताची ऑलिम्पिकमधली कामगिरी फारशी बरी नव्हती. १९८४ आणि १९८८च्या ऑलिम्पिकमध्येही पदकांचा दुष्काळच भारताला बघावा लागला. १९८४च्या स्पर्धेत दिग्गज धावपटू पी. टी. उषा यांचं ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतलं पदकही थोडक्यात हुकलं. पदकांचा हा दुष्काळ १९९२च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्येही कायम राहिला.
हा दुष्काळ संपला, तो १९९६च्या ॲटलांटा ऑलिम्पिकमध्ये, तेही लिअँडर पेसच्या टेनिसमधल्या कास्यपदकानं.
चार वर्षांनी वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी यांनी कास्यपदक पटकावून नवा इतिहास रचला. ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. मल्लेश्वरी यांची कहाणीही मोठी मजेदार आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब क्रीडाक्षेत्रात होतं. चार बहिणीही वेटलिफ्टर्स. पण, कर्णम मल्लेश्वरी लहानपणी फारच बारीक आणि काटकुळ्या असल्यानं त्यांच्या गावातल्या प्रशिक्षकानं त्यांना वेटलिफ्टिंग शिकवायला साफ नकार दिला. मात्र, हार न मानता आईनं दिलेल्या हिंमतीच्या बळावर स्वतःच प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केलेल्या या मुलीनं अख्ख्या देशाचं ऑलिम्पिकमधलं वजन वाढवलं.
२००४च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये राज्यवर्धन सिंह राठोड यांनी नेमबाजीत रौप्यपदक जिंकलं. भारताचं, आणि नेमबाजीतलं हे पहिलंवहिलं रौप्यपदक.
त्यानंतरची, २००८ची ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी ऐतिहासिक ठरली. याच स्पर्धेत अभिनव बिंद्रा यांनी सुवर्णकामगिरी केली. मुष्टियोद्धा विजेंदर सिंह आणि कुस्तीपटू सुशील कुमार यांनीही यावर्षी कास्यपदकं पटकावली.
२०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालनं कास्यपदक पटकावलं. देशाला बॅडमिंटनमध्ये मिळालेलं हे पहिलंवहिलं पदक.
२०१६मध्ये पी. व्ही. सिंधूनं बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक मिळवलं, तर साक्षी मलिकनं कुस्तीत कास्यपदक पटकावलं. ऑलिम्पिकमधली देशाची सगळीच पदकं महिलांनी देशाला मिळवून देण्याची ही पहिलीच वेळ.
२०२०च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची गणना भारताच्या सर्वोत्तम ऑलिम्पिक्समध्ये केली जाते. या स्पर्धेत भारताच्या चमूनं सात पदकांना गवसणी घातली. ऑलिम्पिक हॉकी पदकाचा ४१ वर्षांचा दुष्काळ संपवत पुरुष हॉकी संघानं रौप्यपदक पटकावलं तर महिलांच्या संघानंही चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली. या ऑलिम्पिकमध्ये सगळ्यांचं लक्ष अक्षरशः खेचून घेतलं ते नीरज चोप्राने. भालाफेकीत त्यानं घेतलेला सुवर्णवेध ऐतिहासिक ठरला. भारताचा चमू सात ऑलिम्पिक पदकांसह मायदेशी परतला आणि ही ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी सुवर्णसुफळ संपूर्ण झाली.
भारताचा ऑलिम्पिकमधला हा गेल्या १२४ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास. १० सुवर्ण, ९ रौप्य आणि १६ कास्य अशा एकंदर ३५ पदकांचा आणि प्रसिद्ध-अप्रसिद्ध अशा कितीतरी ऑलिम्पिकवीरांचा हा पट. विजयाचे आनंदी चीत्कार, पराभवाचे उदास उसासे, आशेची नवी भरारी… कौतुक, खंत, अभिमान, निराशा, उमेद अशा कित्येक भावनांनी मुसमुसणारी ही गोष्ट, भारताच्या ऑलिम्पिकप्रवासाची. आता, आजपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या गोष्टीत कोणता नवा अध्याय जोडला जाणार, कोणत्या नव्या व्यक्तिरेखा या गोष्टीच्या पानांवर अवतरणार आणि कशा, हे सगळं बघणं, किंबहुना अनुभवणं नक्कीच थरारक, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असणार आहे. तेव्हा, ही ऑलिम्पिक स्पर्धा आपल्या या गोष्टीत मोलाची भर घालणारी ठरो, अशी आशा करूया.