जगभरात अनेक ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा झाला. संयुक्त अरब अमिरातीमधल्या भारतीय समुदायानं आज भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. अबु धाबीमध्ये राजदूत संजय सुधीर यांच्या हस्ते दूतावासात भारतीय ध्वजारोहण झालं. आपल्या भाषणात त्यांनी भारताची उल्लेखनीय प्रगती आणि संयुक्त अरब अमिरातीसोबतचे मजबूत संबंध यावर प्रकाश टाकला.
दुबईतल्या वाणिज्य दूतावासात कॉन्सुल जनरल सतीश कुमार सिवन यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वातंत्र्योत्सव साजरा झाला.
विविध देशांमधले भारतीय दूतावास आणि इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (ICCR) द्वारे जगभरात आयोजित केलेल्या उत्साहवर्धक कार्यक्रमांच्या मालिकेसह भारतानं आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला
जगभरातील सांस्कृतिक संबंध (ICCR). भारतीय वंशाचे लोक आणि जागतिक स्तरावर भारतमित्रांमध्ये देशभक्ती आणि एकतेची भावना या उत्सवांनी प्रतिबिंबित केली.
नेपाळमध्ये, राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी भारतीय समुदायाचे सदस्य, भारताचे मित्र आणि दूतावासाचे अधिकारी त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित असलेल्या समारंभात राष्ट्रध्वज फडकावला.या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर आणि केंद्रीय विद्यालय, काठमांडू येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं आणि नृत्ये सादर केली
इस्रायलमध्ये राजदूत संजीव सिन्हा यांनी तिरंगा फडकावून भारतीय समुदायाला शुभेच्छा दिल्या.
नेदरलँड्समध्ये, गांधी केंद्रानं भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील कलेच्या भूमिकेच्या महत्त्वावर भर देऊन स्वातंत्र्यदिन साजरा केला.
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यूयॉर्क शहरात दरवर्षी होणाऱ्या विशेष संचलनामध्ये विविधतेतील एकतेचं प्रतीक असलेले आणि भारतातल्या विविध धर्मांचं प्रतिनिधित्व करणारे चार चित्ररथ प्रदर्शित केले जाणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. येत्या रविवारी होणाऱ्या ४२व्या संचलनाच्या निमित्तानं एम्पायर स्टेट बिल्डिंग रात्री तिरंग्यानं उजळून निघणार आहे.