भारताची निर्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत चार पूर्णांक ८६ शतांश टक्क्यांनी वाढून ३९३ अब्ज २२ कोटी डॉलरवर पोचली आहे. गेल्या वर्षी याच सहामाहीत ती ३७५ अब्ज डॉलर इतकी होती. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. या सहामाहीत व्यापारी मालाची निर्यात १ पूर्णांक २ शतांश टक्क्यांनी वाढून २१३ अब्ज २२ कोटी डॉलरवर पोचली आहे, तर सेवा क्षेत्रातली निर्यात ९ पूर्णांक ८१ दशांश टक्क्यांनी वाढली आहे.
यंदा सप्टेंबर महिन्यातच निर्यातीत तीन पूर्णांक ७६ टक्क्यांची वाढ झाली आहे. अभियांत्रिकी उत्पादनं, रसायनं, प्लॅस्टिक, औषधं आणि वस्त्रप्रावरणं यांच्यामुळे निर्यातीला बळ मिळालं आहे. नेदरलँड्स, संयुक्त अरब आमिरात, अमेरिका, ब्राझिल आणि जपान या देशांमध्ये निर्यात जास्त झाली आहे. सध्या जगभरात भूराजकीय संघर्ष आणि आर्थिक समस्या सुरू असतानाही भारताची निर्यात वाढत आहे ही चांगली स्थिती असल्याचं भारतीय निर्यात संघटनांच्या महासंघाचे अध्यक्ष अश्विनीकुमार यांनी म्हटलं आहे.