बंगळुरू इथल्या एम. चिन्नास्वामी मैदानावर काल झालेल्या पन्नास षटकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा सहा गडी राखून पराभव केला आणि मालिका 3-0 अशी निर्विवादपणे जिंकली. अव्वल फिरकीपटू अष्टपैलू दीप्ती शर्मानं 27 धावांत दोन बळी घेत दक्षिण आफ्रिकेच्या महिलांना 215 धावांपर्यंत रोखले आणि त्यानंतर भरात असलेल्या स्मृती मांधानानं केवळ 83 चेंडूत 90 धावा करून, संघाला तिसऱ्या सामन्यात सहज विजय मिळवून दिला. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.