भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज ओदिशामध्ये भुवनेश्वर इथं १८ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उदघाटन करताना बोलत होते. प्रवासी भारतीय दिवस संमेलन, हा केंद्रसरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम, परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाला परस्परांच्या संपर्कात येऊन संवाद साधण्यासाठी महत्वाचं व्यासपीठ प्रदान करतो. भारतीय समुदायाच्या पर्यटनासाठी खास तयार करण्यात आलेल्या ‘प्रवासी भारतीय एक्स्प्रेस’ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दृक्श्राव्य माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला.
युवा प्रवासी भारतीय दिनाच्या उद्घाटना बरोबर काल प्रवासी भारतीय दिनाची सुरुवात झाली. ‘परदेशस्थ भारतीयांचं विकसित भारतासाठी योगदान’, ही यंदाच्या तीन दिवसीय प्रवासी भारतीय दिवस संमेलनाची संकल्पना आहे. विविध देशांमधल्या भारतीय समुदायाचे सदस्य मोठ्या संख्येनं या संमेलनाला उपस्थित आहेत. डॉ एस जयशंकर, अश्विनी वैष्णव, जुआल ओरम आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री या अधिवेशनाला उपस्थित आहेत.
जगभरात भारता विषयीची धारणा मजबूत करण्यात युवा प्रवासी भारतीयांनी महत्वाची भूमिका बजावली असून, देशाने ‘विकसित भारताच्या’ दिशेनं प्रवास सुरु केला आहे, असं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यावेळी म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्या परदेशस्थ भारतीय समुदायाच्या सदस्यांना विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘राष्ट्रपती प्रवासी भारतीय सन्मान’ प्रदान करतील.