भारतीय लष्कराच्या दुसऱ्या वार्षिक वारसा महोत्सवाचं उद्घाटन काल नवी दिल्लीत सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते झालं. जागतिक आणि भारतीय थिंक टँक, व्यावसायिक, सरकारी आणि खासगी क्षेत्रे, स्वयंसेवी संस्था आणि शिक्षणतज्ज्ञ यांना एकत्रित आणून भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि लष्करी वारसा यावर लक्ष केंद्रित करण्याचा या दोन दिवसीय महोत्सवाचा उद्देश आहे. यावेळी जनरल चौहान यांनी शौर्य गाथा या प्रकल्पाचा प्रारंभ केला. शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून भारताच्या लष्करी वारशाचे जतन आणि संवर्धन करणे हा याचा उद्देश आहे. यावेळी त्यांच्या हस्ते निवृत्त एअर मार्शल विक्रम सिंग यांनी लिहीलेल्या बिकॉज ऑफ दिस: अ हिस्ट्री ऑफ द इंडो-पाक एअर वॉर डिसेंबर 1971 या पुस्तकासह प्रमुख लष्करी साहित्याचं प्रकाशन करण्यात आलं. या महोत्सवानिमित्त संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डीआरडीओच्या वतीनं संरक्षण संशोधनातील नवकल्पनांद्वारे आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देण्यासाठीचा तिचा प्रवास आणि संधी यावर प्रकाश टाकणारे एक छायाचित्र प्रदर्शन आयोजित केलं आहे. तिन्ही सैन्य दलांमधील संधींची माहिती देणारी दालनेही या प्रदर्शनात आहेत.