डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

T20 क्रिकेट विश्वचषक १७ वर्षांनी जिंकणाऱ्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक तब्बल १७ वर्षांनी जिंकणाऱ्या भारतीय संघावर चहूकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या या विजयानंतर देशभरात क्रिकेटप्रेमींच्या जल्लोषाला उधाण आलं होतं, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, हैद्राबाद, दिल्ली या शहरांसह जागोजागी रस्त्यांवर तिरंगा फडकावत क्रिकेट प्रेमींनी विजयोत्सव साजरा केला. 

भारतीय क्रिकेट संघाच्या या कामगिरीनं देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांचं हृदय जिंकलं अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही संपूर्ण स्पर्धेत भारतानं केलेल्या गौरवास्पद कामगिरीबद्दल संघाचं अभिनंदन केलं आहे.

आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही अखेरच्या चेंडू पर्यंत रंगलेला चित्तथरारक सामना जिंकल्याबद्दल भारताचं अभिनंदन केलं आहे.या  खेरीज विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी भारताच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.

स्पर्धेच्या काल वेस्टइंडिजमध्ये बार्बाडोस इथं झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारतानं विजेतेपदाला गवसणी घातली. यापूर्वी दोन हजार सात मधे पहिला टी ट्वेंटी विश्वचषक भारतानं जिंकला होता. मोक्याच्या वेळी सामनावीर विराट कोहलीनं केलेली ७६ धावांची निर्णायक खेळी तसंच अक्षर पटेलच्या ४७ धावा, बुमराह, अर्शदीप आणि हार्दिक यांची शेवटच्या पाच षटकांमधली जबरदस्त गोलंदाजी आणि शेवटच्या षटकात सुर्यकुमार यादव यानं घेतलेला अफलातून झेल ही भारताच्या विजयाची वैशिष्ट्यं ठरली.

राहुल द्रविड यांचा भारताचे प्रशिक्षक म्हणून हा अखेरचा असलेल्या या सामन्यात विजयानंतर, कर्णधार रोहीत शर्मा तसंच विराट कोहली यांनीही आपला हा अखेरचा टी ट्वेंटी सामना असल्याची घोषणा केली. त्यामुळे हे विश्वविजेतेपद या तिघांसाठी सन्माननीय निरोप ठरला आहे.

अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघावर बक्षिसांचाही वर्षाव झाला आहे. विजेतेपदासाठी २० कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम त्यांनी आपल्या नावे केली. ही आजवरची सर्वात मोठी बक्षिसाची रक्कम ठरली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा