डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यात युक्रेन आणि बांगलादेशातल्या परिस्थितीवर चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी युक्रेनमधील स्थितीसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. ज्यो बायडन यांनी भारत-अमेरिका सर्वंकष जागतिक भागीदारीसाठी दाखवलेल्या बांधिलकीबद्दल प्रधानमंत्री मोदींनी यावेळी त्यांची प्रशंसा केली. उभय देशांमधली ही भागीदारी लोकशाही, कायद्याचं राज्य या समान मूल्यांवर आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये असलेल्या परस्पर दृढ संबंधांवर आधारित आहे. या चर्चेवेळी मोदी आणि बायडन यांनी द्विपक्षी संबंधांमध्ये झालेल्या लक्षणीय प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही देशांच्या नागरिकांना तसंच समस्त मानवजातीला त्याचा फायदा व्हावा हा या वाढत्या संबंधांचा मुख्य उद्देश आहे. युक्रेनमधील स्थितीबाबत चर्चा करताना प्रधानमंत्री मोदींनी बायडन यांना त्यांनी अलीकडेच केलेल्या युक्रेन दौऱ्याची माहिती दिली. तिथं लवकरात लवकर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित व्हावं याकरिता भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचा आणि कोणत्याही समस्येवर संवाद आणि मुत्सद्देगिरीतून तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेचा प्रधानमंत्री मोदींनी पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी बांगलादेशातील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. बांगलादेशातील कायदा आणि सुवव्यवस्थेची स्थिती पूर्ववत व्हावी आणि तिथल्या अल्पसंख्याकांची विशेषतः हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जावी यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा