भारत आणि थायलंड यांनी आज आयटी, सागरी क्षेत्र, लघु आणि मध्यम उद्योग, हातमाग आदी क्षेत्रात सहकार्य करण्याच्या दृष्टीने सहा सामंजस्य करार केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि थायलंडचे प्रधानमंत्री पेईतोंगटार्न शिनावात्रा यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार झाले. दोन्ही देशातली धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याचा निर्णय या चर्चेत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.
दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांमधे धोरणात्मक संवाद वाढवणं, पर्यटन, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. व्यापार , गुंतवणूक वाढवण्याबाबतही दोन्ही देशात सहमती झाली. बौद्ध धर्म हा दोन्ही देशातला महत्वाचा दुआ असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. या भेटीत शिनावात्रा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्रिपिटीकाची पाली भाषेतली प्रत भेट दिली. याबद्दल मोदी यांनी शिनावात्रा यांचे आभार मानले.
त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथे पोहोचले. विमानतळावर थायलंडचे उपप्रधानमंत्री सूर्या जुआनग्रुआंकित यांनी मोदी यांचं स्वागत केलं. सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री उद्या उपस्थित राहणार आहेत. या शिखर परिषदेत अनेक करार आणि घोषणा होण्याची शक्यता आहे. ही परिषद आटोपून मोदी उद्या तीन दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.