भारत सिंगापूर दरम्यान आज चार महत्त्वाचे करार झाले. आरोग्य आणि वैद्यक, शिक्षण आणि कौशल्यविकास, डिजिटल तंत्रज्ञान, आणि सेमीकंडक्टर भागीदारी या क्षेत्रात सहकार्याविषयीचे हे करार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर भारताच्या पूर्वेकडे चला धोरणाच्या अनुषंगाने सिंगापूरबरोबर धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर सहमती झाली. त्यानंतर प्रधानमंत्री भारताकडे रवाना झाले. सिंगापूरची भारतात सुमारे १६० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक असून भारतात शाश्वत आणि जलद विकासामुळे गुंतवणुकीच्या अपार संधी खुल्या झाल्या असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. उभय देशांमधल्या संरक्षण, सागरी प्रभुत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या सहकार्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. सिंगापूरमधे भारताचं तिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र लौकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा प्रधानमंत्री मोदी यांनी केली. त्यानंतर मोदी यांनी सिंगापूरमधल्या सेमीकंडक्टर कंपनीला भेट दिली.
सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांचीही मोदी यांनी भेट घेतली. आणि सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.