तांदळासारख्या पदार्थांची निर्यात करून आफ्रिकन देशात अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत CII भारत – आफ्रिका उद्योग परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आफ्रिकन देशांमधल्या आरोग्य सुविधांची प्रगती करण्यात भारतीय औषध निर्मिती कंपन्यांचा मोठा वाटा आहे, टेलिमेडिसीन सेवेत आफ्रिका हा भारताचा प्रमुख भागीदार असून जगभरातल्या देशांना या सेवेचा लाभ होऊ शकतो, असं बर्थवाल यांनी सांगितलं.
यावेळी बुरुंडी देशाचे उप राष्ट्राध्यक्ष प्रॉस्पर बझोबान्झा यांनी आर्थिक भागीदारी बुरुंडीच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचं सांगितलं. लायबेरियाचे उप राष्ट्राध्यक्ष जेरेमिया काँग यांनी आपल्या देशात कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी भारताला आमंत्रित केलं. भारत-आफ्रिका उद्योग परिषद ही भारत आणि आफ्रिकन देशातले संबंध दृढ करण्यासाठीचं मोठं पाऊल असल्याचं मॉरिशसचे उप राष्ट्राध्यक्ष मेरी सिरील एडी बोईसझन म्हणाले.