डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नागरी विमानवाहतुकीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर

देशांतर्गत विमानवाहतुकीत भारत जगातील तिसरा देश ठरला आहे. अमेरिका आणि चीननंतर भारतानं हा मान मिळवला आहे. ऑफिशिअल एअरलाइन गाइड म्हणजे ओएजी या विमानवाहतुकीबाबत विश्लेषण करणाऱ्या संस्थेनं ही माहिती दिली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, इंडिगो आणि एअर इंडियासारख्या कंपन्यांनी त्यांच्या ताफ्यात वाढ केल्यामुळे भारताचं स्थान पुढे गेल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

 

भारतात विमानांमधील आसनांची क्षमता एप्रिल २०१४ मध्ये ७९ लाख होती, ती एप्रिल २०२४ मध्ये एक कोटी ५५ लाख इतकी झाल्याचं ओएजीनं म्हटलं आहे. त्यामुळे ९७ लाख आसनांची क्षमता असणाऱ्या ब्राझिलला भारतानं मागं टाकून तिसरा क्रमांक मिळवला आहे. ९२ लाख आसनांची क्षमता असणारा इंडोनेशिया पाचव्या स्थानावर आहे. भारताचा आसनांमध्ये वाढीचा दर ६ पूर्णांक ९ दशांश टक्के इतका असून, त्यात भारताचा पाच देशांमध्ये पहिला क्रमांक आहे. चीनचा दर ६ पूर्णांक ३ दशांश टक्के, तर अमेरिकेचा दर २ पूर्णांक ४ दशांश टक्के इतका आहे. इंडिगो आणि एअर इंडिया यांच्याकडे मिळून एक हजारपेक्षा जास्त विमानं असून, एकंदर आसनक्षमतेपैकी नव्वद टक्के क्षमता या दोन कंपन्यांची असल्याची माहिती ओएजीनं दिली आहे.

 

दरम्यान, दिल्लीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांच्या प्रवासीभाड्यांमध्ये अनैसर्गिक वाढीबाबत देखरेख ठेवावी आणि असा कोणता प्रकार आढळून आल्यास कारवाई करावी अशा सूचना विमानवाहतूक मंत्रालयानं दिल्या आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल टी १ डीमध्ये झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या दुर्घटनांमुळे विमानफेऱ्या रद्द झाल्यास किंवा त्यांच्या वेळा बदलल्यास कोणत्याही दंडाची आकारणी करता कामा नये असंही विमानवाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा